देवरुख :इराण आणि इस्रायलमधील वाढत्या युद्धजन्य तणावामुळे दुबईतील विमान सेवा अचानक विस्कळीत झाली असून, यात रत्नागिरी जिल्ह्यातील १३ जण अडकले आहेत. यामध्ये देवरुखचे ज्येष्ठ पत्रकार सुरेश सप्रे, त्यांच्या पत्नी ज्योती सप्रे, साखरपा येथील शिवसेना नेते बापू शेट्ये, त्यांच्या पत्नी सोनम शेट्ये, भाजप नगरसेविका श्रद्धा इंदुलकर, जितेंद्र निमकर परिवार आणि चिपळूणचे सनी जागुष्टे यांचा समावेश आहे.
सुरुवातीला या सर्वांशी संपर्क होऊ न शकल्याने संगमेश्वर तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र, आज सकाळी या सर्वांनी आपण सुरक्षित असल्याचे संदेशाद्वारे कळवले आहे. विमान उड्डाणे रद्द झाल्यामुळे हे सर्वजण सध्या दुबईतील एका हॉटेलमध्ये थांबले असून, परिस्थिती सामान्य होईपर्यंत त्यांना तिथेच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चिपळूणचे सनी जागुष्टे यांनीही फोनवरून आपण सर्वजण एकमेकांच्या संपर्कात असून सुरक्षित असल्याची खात्री दिली आहे. त्यामुळे नातेवाईकांनी किंवा नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि काळजी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.