दीड वर्षांहून अधिक काळ भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदाची नियुक्ती रखडली होती. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया लांबली होती. मात्र, काल (14 डिसेंबर) भाजपने बिहारमधील मंत्री नितीन नबीन यांची नियुक्ती जाहीर करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. वयाच्या अवघ्या 45 व्या वर्षी ते भाजपचे आतापर्यंतचे सर्वात तरुण राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष ठरले आहेत.

नवीन नियुक्त अध्यक्ष नितीन नबीन आज (15 डिसेंबर) नवी दिल्लीत पदभार स्वीकारणार असून त्यासाठीची तयारी सुरू आहे. ते बिहारमधील पाटणा जिल्ह्यातील बांकापूर मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. सध्या ते नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून कार्यरत आहेत.

नितीन नबीन यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. त्यांनी 1998 मध्ये नवी दिल्लीतील सीएसकेएम पब्लिक स्कूलमधून बारावी, तर 1996 मध्ये सेंट मायकल हायस्कूलमधून दहावी उत्तीर्ण केली. भाजपचे दिवंगत नेते नवीन किशोर प्रसाद सिन्हा हे त्यांचे वडील असून वडिलांच्या निधनानंतर ते सक्रिय राजकारणात उतरले.

2010 मध्ये पोटनिवडणूक जिंकून त्यांनी आमदारकीची सुरुवात केली. त्यानंतर 2010, 2015, 2020 आणि 2025 या निवडणुकांत ते सातत्याने विजयी झाले. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी 98,299 मते मिळवत आरजेडीच्या रेखा कुमारी यांचा 51,936 मतांनी पराभव केला.

शपथपत्रानुसार नितीन नबीन यांची जंगम मालमत्ता सुमारे 99.71 लाख रुपये आहे. त्यांच्या नावावर कोणतीही स्थावर मालमत्ता नाही. मात्र, पत्नी दीपमाला श्रीवास्तव यांच्या नावावर 66.52 लाख रुपयांची जंगम आणि 1.47 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहेत.