खेड : – तालुक्यातील धामणदिवी ग्रामपंचायतीत जीईएम पोर्टलवरील खरेदीतील अनियमतेबाबत व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात झालेल्या विकास कामांमध्ये अनियमितता दिसून येत असल्याने ग्रा.पं.चे माजी सदस्य संदेश सोनू पेवेकर हे दि.३ मार्च २०२६ पासून येथील पंचायत समितीसमोर उपोषणास बसले होते. त्यावेळी उपोषकर्त्यांच्या म्हणण्यानुसार ग्रा.पं.च्या कागदपत्रांच्या पडताळणीत अनियमितता आढळल्यास दोषारोपपत्र सादर करा. असा आदेश जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी तशा आशयाचे लेखी पत्र उपोषणकर्ते श्री.पेवेकर यांना देऊन तसा प्रस्ताव येत्या आठ दिवसांत जिल्हापरिषदेकडे पाठविण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे श्री.पेवेकर यांनी उपोषण स्थगित करून आश्वासनाची पूर्तता न झाल्यास पुन्हा उपोषण करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासन पत्रात नमूद केले आहे की., ग्रामपंचायत धामणदिवी यांनी जीईएम पोर्टलवरील केलेल्या खरेदीमध्ये तफावत असलेबाबत तसेच ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात झालेल्या विकास कामामध्ये अनियमितता दिसून येत असून यामध्ये सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केल्याबाबतचा अहवाल उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं) जि.प रत्नागिरी यांना सादर करण्यात आलेला आहे. तसेच सर्व कागदपत्रांची परिपूर्ण पडताळणी करण्यात यावी व संबंधितांनी अनियमीतता केल्याचे आढळून आल्यास सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव दोषारोप पत्रासह जिल्हापरिषदेकडे सादर करण्यात येईल व किरकोळ स्वरुपाची अनियमीतता आढळून आल्यास ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (शिस्त व अपिल) नियम १९६४ नुसार कार्यवाही करण्यात यावी व संबंधिताकडून झालेल्या अनियमीततेबाबतची पुर्तता करुन घेणेत यावी असे कळविणेत आले आहे. GEM पोर्टलवरील केलेल्या खरेदीमध्ये झालेल्या तफावतींच्या कागदपत्रांची पुर्नपडताळणी करुन वरिष्ठांकडे अहवाल सादर करण्यात येईल. त्याप्रमाणे संबंधितावर नियमानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव दोषारोपासह जिल्हा परिषदेकडे आठ दिवसात सादर करण्यात येईल. यामध्ये सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी जे दोषी आढळुन येतील, त्यांच्यावर योग्य ती कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. तसेच ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात झालेल्या विकास कामांची पुर्नतपासणी करणेसाठी उपअभियंता (बांधकाम) जि.प. उपविभाग खेड यांना स्वतंत्र पत्र देऊन सदर कामांचा अहवाल घेऊन जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात येईल. असे लेखी पत्र देण्यात आले आहे.