भांडुप पश्चिम भागात बेस्टच्या इलेक्ट्रिक बसचा भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला आहे, तर दहा जण जखमी झाले आहेत.ही दुर्घटना सोमवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास भांडुप पश्चिमेतील स्टेशन रोड परिसरात घडली. बेस्टची आकाराने मोठी इलेक्ट्रिक बस मागे घेत असताना अचानक चालकाचा ताबा सुटला. याच वेळी रस्त्यावर असलेल्या नागरिकांना बसची जोरदार धडक बसली.
या अपघातात एकूण १३ जण बसखाली सापडले, त्यापैकी चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.अपघातानंतर तातडीने स्थानिक नागरिक, पोलीस आणि रुग्णवाहिकांनी मदतकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.या प्रकरणी पोलिसांनी बसचालकाला ताब्यात घेतले असून, अपघात नेमका कसा झाला याचा तपास सुरू आहे. बेस्ट बस भाडेतत्त्वावर चालवली जात असल्याचीही माहिती समोर आली आहे.कुर्ला बस दुर्घटनेच्या आठवणी ताज्या असतानाच घडलेल्या या घटनेमुळे मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत यांनी सांगितले. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
