पुणे : श्री अक्कलकोट राजघराण्याने दीडशे वर्षे जतन करून ठेवलेला परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या नित्य वापरातील दिव्य सूर्यमणी आणि चैतन्यदायी पादुकांचे दर्शन प्रथमच अक्कलकोटच्या राजवाड्याबाहेर पुण्यामध्ये भक्तांना घेता येणार आहे, अशी माहिती अक्कलकोटचे राजे श्रीमंत मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले (तिसरे) यांनी दिली आहे.

श्री अक्कलकोट राजघराणे छत्री ट्रस्ट, सोलापूर यांच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ सूर्यमणी आणि पादुका दर्शन सोहोळा येत्या १७ आणि १८ मार्च रोजी दोन दिवस सायंकाळी पाच ते रात्री १० आणि १९ मार्च रोजी सकाळी आठ ते रात्री १० वाजेपर्यंत एरंडवणे १०० फूट डीपी रस्त्यावरील सिद्धी साज बँक्वेट येथे संपन्न होईल. या दोन्ही दिवशी पादुकांवर अभिषेक होणार असून त्यामध्ये सहभागी होण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करून आपली नावनोंदणी करावी.तसेच १९ रोजी भव्य याग होणार असून त्यामध्येही भाविकांना दर्शन घेता येणार आहे. १९ तारखेला सायंकाळी एका विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. अशी माहिती श्री भोसले यांनी दिली.
भक्तांना परिचित असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या अनेक चित्रांमध्ये आणि प्रतिमांमध्ये स्वामी महाराज आपल्या दोन बोटांमध्ये एक तेजस्वी मणी धारण करून बसलेले दिसतात. हा सूर्यमणी श्री स्वामी समर्थ महाराजांनी स्वतः अक्कलकोटच्या राजघराण्यास दिला, तेव्हापासून तो अत्यंत श्रद्धा, भक्ती आणि जतनाने राजघराण्याकडे सुरक्षित ठेवण्यात आला आहे, असे श्री.मालोजीराजे यांनी सांगितले.