रोहा ( अल्ताफ चोरडेकर ) : भिरा फाटा ते सुतारवाडी तसेच आंबेवाडी विभागात माती माफियांनी अक्षरशः हैदोस घातला आहे. अनेक पुढाऱ्यांनी सत्तेचा दूरोपयोग करुन दिवसा ढवल्या डोंगर पोखरून लाखो रुपये किंमतीची माती चोरी करुन शासनाच्या नियमांची पायमल्ली केली आहे.

अर्थातच या माती चोरट्यांना काही अधिकारी वर्गाचा देखील छुपा पाठींबा असल्याचे बोलले जात आहे. मात्र उशिरा का होईना महसूल खात्याला जाग आल्याने कुडली येथे शेत जमिनीमध्ये बेकायदेशीर माती ऊत्खणन करुन माती चोरी करणाऱ्या चौघांना पहाटे ३ वा. च्या सुमारास रंगेहाथ पकडून त्यांच्या विरोधात कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महसूल खात्याच्या या धडक कारवाईत ५६ लाखांचा साहित्य जप्त करण्यात आले असून या घटनेमुळे आंबेवाडी विभागात खळबळ उडाली आहे.

कुडली गावात विष्णू भीमराव पडवळ यांच्या मालकीची शेत जमीन असून रात्री अंधाराचा फायदा घेत आरोपी अबूसमा शफिकूल अलम,एम.डी.बशीर जिहाउल हाक,याकूब आली हबिबूल रेहमान,संजय कुमार गोविंद यादव या चार परप्रांतीय तरुणांनी संगणमत करुन शासनाची परवानगी न घेता बेकायदेशीररित्या जेसीबी यंत्रनेचा वापर करुन शेतातील माती ऊत्खणन करुन सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केले. या दरम्यान शुक्रवारी पहाटे ३ वा.च्या सुमारास घटना स्थळी जाऊन कारवाईचा बडगा उगारला. या कारवाई ४० लाख रु.किंमतीचे २ डंपर व २५ लाख रु. किंमतीची एक जेसीबी मशीन असे एकूण ६५ लाख रु. किंमतीचे साहित्य जप्त करून चार आरोपी विरोधात महसूल अधिकारी दीपक राठोड यांच्या तक्रारीनुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी पुढील तपास सपोनी बी. बी.फार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई भोजकर अधिक तपास करित आहेत…