लोटे ( ज्ञानेश्वर रोकडे ) : खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहती मधील थर्स ऑरगॅनिक या रासायनिक कारखान्यात एका नवीन उत्पादनाची प्रक्रिया करत असताना रसायनाच्या ड्रम मध्ये स्फोट होऊन एका कामगाराला किरकोळ दुखापत झाल्याची घटना आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली.
यावेळी कारखान्यात पहिली पाळी आणि सर्वसाधारण पाळी मधील कामगार आणि कंपनीचे कर्मचारी व अधिकारी असे मिळून २८ जण हजर होते. एका नवीन उत्पादनाची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेण्यासाठी एका ड्रममध्ये रसायनाचे मिश्रण केले जात होते. त्यावेळी अचानक तापमान वाढून रसायनाने प्लेट घेतला आणि हलकासा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज नजीकच असलेल्या अग्निशमन दलापर्यंत पोहोचला आणि तात्काळ अग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी श्री नलावडे इतर जवानांसह आगीच्या बंबासहित दाखल झाले. मात्र तत्पूर्वीच कारखाना व्यवस्थापनाने रसायनाची आग विझवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले होते. या दरम्यान धावपळीमध्ये एका कामगाराचा पाय मुरगळल्याने किरकोळ दुखापत झाली. कारखाना व्यवस्थापनाने तात्काळ त्या कामगाराला उपचारार्थ नजीकच्या दवाखान्यात हलवले.