खेड (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात मंगळवारी सकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास ‘अलबत्या गलबत्या’ नाट्यसंघाच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात गाडीत असलेल्या दोघांना दुखापत झाली असून त्यांच्यावर कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाचा गोव्यातील प्रयोग आटपून संपूर्ण टीम मुंबईच्या दिशेने परतत होती. यावेळी भोस्ते घाट उतरत असताना त्यांच्या बसने समोर चाललेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. प्राथमिक माहितीनुसार, घाट उतरताना अचानक बसच्या ब्रेकमध्ये बिघाड झाल्याने हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या अपघातात नाटकाचे साउंड आर्टिस्ट विलास दाते आणि बस चालक प्रकाश आव्हाड हे जखमी झाले आहेत. विलास दाते यांच्या डोक्याला मार लागून त्यांना तीन टाके घालावे लागले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य हाती घेत जखमींना रिक्षामधून कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच साहित्यप्रेमी उत्तमकुमार जैन यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली तसेच त्यांना आवश्यक ते सहकार्य केले. दरम्यान, अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे २५ जण प्रवास करत असल्याची माहिती समोर आली असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.
भोस्ते घाटात ‘अलबत्या गलबत्या’ टीमच्या गाडीचा अपघात; दोन जखमी, कळंबनी रुग्णालयात उपचार सुरू
