मंडणगड : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व मंडणगड पोलिस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक माहिती अधिकार दिनाचे’ औचित्य साधून नुकतेच मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंडणगड पोलिस स्टेशनचे पोलिस उपरिनिक्षक श्री. राहिदास केंद्रे हे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये, कार्यक्रमाधिकारी डॉ. संदीप निर्वाण, मंडणगड पोलिस स्टेशनचे श्री. अशोक गायकवाड, श्री. विनय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रभारी प्राचार्य डॉ.वाल्मिक परहर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी डॉ.संदीप निर्वाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना माहिती अधिकाराबाबत थोडक्यात माहिती सांगितली.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलिस उपनिरिक्षक श्री. रोहिदास केंद्रे यांनी सांगितले की, हा ‘माहिती अधिकार कायदा 2005’ हा सामान्य माणसाला, सत्ताध-यांना जबाबदार ठरवण्याचे शक्तीशाली हत्यार आहे. यामुळे कोणत्याही प्रकारच्या कामामध्ये पारदर्शकता वाढते, भ्रष्टचाराला आळा बसतो आणि शासन-प्रशासन लोकांच्या नजरेसमोर रहाते. माहिती अधिकार हा फक्त कागदावरील हक्क न राहता प्रत्यक्षात लोकांच्या हातातली ताकत बनला पाहिजे. यामुळे लोकशाही जीवंत राहणे सोपे होईल. माहिती अधिकाराचा वापर गैरकामाकरिता न होता तो चांगल्या कामासाठी व्हावा याकरिता समाजामध्ये जनजागृती होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय समारोप करताना प्रभारी प्राचार्य डॉ.वाल्मिक परहर यांनी माहिती अधिकारावर बोलताना 28 सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक माहिती अधिकार दिन’म्हणून पाळला जातो. याचा उद्देश हा नागरिकांचे सक्षमिकरण, गोपनियतेविरुध्द लढा आणि शाश्वत विकासाला चालना असा आहे. प्रत्येक व्यक्तीला माहिती शोधण्याचा, ती मिळवण्याचा आणि ती इतरांपर्यंत पोहोचवण्याचा अधिकार असावा. कारण एक जागरुक विद्यार्थीच हा उदयाचा जागरुक नागरिक बनतो. या कायदाचा वापर आपण सत्य शोधण्यासाठी, अन्याय दुर करण्यासाठी आणि आपल्या देशाचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी करावा असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.संदीप निर्वाण यांनी केले तर आभार उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये यांनी मानले.