खेड (दिवाकर प्रभु) : बहुचर्चित भरणे-खेड-दापोली मार्गाच्या कामाची रखडपट्टी उडाली आहे. खेड हद्दीतील केवळ २ कि.मी. अंतरावरील रस्त्याचे काम सुरू असून येत्या ३० एप्रिलपर्यंत भरणे ते अण्णाचा पऱ्या इतपर्यंतचे काम पूर्ण करून पावसाळ्यात ही दुहेरी मार्गिका सुरू करण्यात येणार आहे. तसेच अण्णाचा पऱ्या ते हॉटेल कॅफे कॉर्नर या रस्त्याचे काम पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेडच्या उपअभियंता श्रीमती आशा जठाल यांनी ‘दैनिक सागर’शी बोलताना दिली.

भरणे-खेड मार्गावरील भरणे ते खेड येथील एका मार्गिकेचे काम पूर्ण करून ती वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. तर दुसऱ्या मार्गिकेचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, आधीच पहिल्या मार्गिकेचे काम पाच महिने लांबल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीसह अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यामुळे येत्या ३० एप्रिलपर्यंत हे काम पूर्ण करण्याची डेडलाईन ठेकेदार पाळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दापोली-खेड हे अंतर २९ कि.मी. आहे. दापोलीपासून ठिकठिकाणी या रस्त्याचे काम सुरू आहे. सध्या खेड शहरातील तीनबत्ती नाका ते डेंटल कॉलेज या मार्गावरील काम संथ गतीने सुरू आहे. सुर्वे इंजिनिअरिंगजवळ असणारी मोरी काढून त्याठिकाणी ८ फूट उंचीचा पूल बांधण्यात येत आहे, जेणेकरून पावसाळ्यात येथे पाणी साचून वाहतूक ठप्प होण्याचे प्रमाण कमी होईल. तसेच रस्त्याखाली नगरपरिषदेची पाण्याची पाइपलाइन असून ती बाजूने नेण्याचे काम सुरू असल्याने येथील कामाला उशीर होत आहे.

अण्णाचा पऱ्या ते कॅफे कॉर्नर हॉटेल इतपर्यंत १५ मीटरचा रस्ता, खांबतळे ते नाना-नानी पार्क येथील रस्ता १२ मीटर, तर नाना-नानी पार्क ते डेंटल कॉलेज हा रस्ता १५ मीटरचा असणार आहे. तसेच खांबतळे येथील अवघड वळण कमी करण्यात येणार आहे. खांबतळे ते अण्णाचा पऱ्या या मार्गावरील जमीन नगरपरिषदेकडून ताब्यात देण्यात आलेली नाही. तसेच पाइपलाइन बदलण्याचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने या मार्गावरील काम पावसाळ्यानंतरच सुरू होणार असल्याचे चित्र आहे.

धुळीने नागरिक हैराण
बसस्टँड ते डेंटल कॉलेज दरम्यान पर्यायी रस्ता काढण्यात आला आहे. मात्र, या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत आहे. पर्यायी रस्त्यासाठी जागा दिलेल्या मालकांनी त्या मार्गावर खडी टाकण्यास विरोध केल्याने नागरिकांना धुळीतून तोंड झाकून प्रवास करावा लागत आहे. तसेच मातीच्या भरावावर पाणी मारल्याने दुचाकी घसरून अपघात होत आहेत. अण्णाचा पऱ्या ते बसस्टँड या मार्गाचे काम करताना रस्ता डायव्हर्शनचे मोठे आव्हान निर्माण होणार आहे. या मार्गावरील वाहतूक वळविण्यासाठी खेड नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. एकंदरीत पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेली डेडलाईन पाळली जाते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

टाऊन प्लॅनिंग विभागाकडून सर्च रिपोर्ट मिळाल्यानंतर संबंधित जागा मालकांना नोटिसा काढण्यात येणार असून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील काम पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येईल, असे येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी सांगितले.