लांजा (गोविंद चव्हाण) : लांजा शहरात दोन ठिकाणी रामनवमी जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
प्रथम, कनावजे वाडी येथील श्री शिनकर गुरजी यांच्या निवासस्थानी संगीत नारदीय कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. हे कीर्तन ह.भ.प. पराडकर यांनी सादर केले. ह.भ.प. पराडकर यांनी रामचरित्रावर प्रबोधन केले. दशरथ राजांना एक स्वप्न पडले की, त्यांना तिघांनी मारले. ते म्हणाले, “मी कुणाचेही वाईट केले नाही, मग मला तिघांनी का मारले?” म्हणून त्यांनी वशिष्ठ ऋषींना बोलावून पडलेले स्वप्न सांगितले आणि माझी कुंडली पाहून असे स्वप्न का पडले ते सांगा, असे विचारले. वशिष्ठ ऋषींनी पंचांग पाहून सांगितले, “राजा, तुला घाबरण्याचे काही कारण नाही.” त्यावर राजा म्हणाले, “मग अशा स्वप्नात मला का मारले?” यावर वशिष्ठ ऋषींनी उत्तर दिले, “याचे उत्तर आज सांगणार नाही; वेळ आल्यावर सांगेन.” तरीही राजा घाबरलेले होते.
महाशिवरात्रीच्या दिवशी राजा आपले साहित्य घेऊन शिकारीसाठी जंगलात गेला. तिथे एक तळे होते आणि त्या ठिकाणी बेलाचे झाड होते. दशरथ राजा त्या झाडावर चढून तळ्याजवळ कोणी पाणी पिण्यासाठी येईल, अशी वाट पाहू लागला. तो बेलाची पाने तोडून खाली टाकत होता. खाली शंकराची पिंडी होती. त्या पिंडीवर पाने पडल्याने भगवान शिव प्रसन्न झाले.
त्यावेळी श्रावणबाळ आपल्या आई-वडिलांना घेऊन काशीला जात होते. त्यांच्या आई-वडिलांना तहान लागली. त्यामुळे श्रावणबाळाने आई-वडिलांची कावड तिथे ठेवून पाणी आणण्यासाठी गेला. त्याला तळे दिसले. त्या तळ्यातून पाणी काढण्यासाठी त्याने झारी पाण्यात बुडवली, तेव्हा बुडबुड्याचा आवाज झाला. तो आवाज ऐकून दशरथ राजाने बाण सोडला आणि तो बाण श्रावणबाळाला लागला.
श्रावणबाळ ओरडला. दशरथ राजा झाडावरून खाली उतरून त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, “बाळ श्रावण, माझ्या हातून नकळत चुकून तुला बाण लागला.” त्यावर श्रावण म्हणाला, “मी माझ्या आई-वडिलांना घेऊन काशीला जात होतो. आता मी मरणार आहे. कृपया माझ्या आई-वडिलांना पाणी नेऊन द्या.” बराच वेळ झाल्याने आई-वडील श्रावणाची वाट पाहत होते. इतक्यात दशरथ राजा पाणी घेऊन आले. ते पाणी देत असताना आई-वडील म्हणाले, “बाळा, तू बोल. तू बोललास तरी आमची तहान भागेल. तुला पाणी आणायला त्रास झाला असेल, आम्हाला पाणी नको.”
तेव्हा दशरथ राजा म्हणाला, “मी तुमचा श्रावण नाही.” त्यावर त्यांनी विचारले, “मग तू कोण आहेस?” राजा म्हणाला, “मी दशरथ राजा आहे.” त्यांनी विचारले, “माझा श्रावण कुठे आहे?” राजा म्हणाला, “माझ्या हातून चुकून बाण लागून तो मरण पावला.” हे ऐकून श्रावणाच्या आई-वडिलांनी दशरथ राजाला शाप दिला, “आम्ही ‘पुत्र, पुत्र’ म्हणत प्राण सोडत आहोत. आमच्या तिघांचे अंत्यसंस्कार एकाच सरणावर कर. तुलाही चार पुत्र होतील, पण तुझ्या मृत्यूच्या वेळी एकही पुत्र तुझ्या जवळ नसेल.”
नंतर वशिष्ठ ऋषी दशरथ राजाजवळ आले आणि म्हणाले, “राजा, तू मला स्वप्नाबद्दल विचारले होतेस ना? त्या स्वप्नात दोन पुरुष आणि एका महिलेने तुला मारले होते. प्रत्यक्षात तुझ्या हातून दोन पुरुष आणि एका महिलेला अग्नी देण्यात आला. हेच तुझ्या स्वप्नाचे उत्तर आहे.”
