शिरगाव : चिपळूण तालुक्यातील शिरगाव परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे अनेकांच्या दुकान व घरावरील पत्रे उडाली, तर कुंभार्लीमध्ये विजेचे पोल पडले. अनेक ठिकाणी विद्युत तारांवर फांद्या पडून नुकसान झाले असून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चिपळूण तालुक्यातील शिरगाव परिसरात दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सुरुवातीला वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. यावेळी रफीक शेख व योगेश लबधे यांच्या दुकान व घरावरील पत्रे उडाली. तसेच कुंभार्लीमध्ये काही ठिकाणी विजेचे पोल कलंडले, तर अनेक विद्युत तारांवर फांद्या पडल्या. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे.
एक तास पडलेल्या वादळी पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली असून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. त्यात आंबा पीकही धोक्यात आले आहे.