खेड : तालुक्यातील हेदली बाजारवाडी येथे कौटुंबिक वादातून मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३० मार्च २०२६ रोजी रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अपर्णा जनार्दन शिंदे (वय ५२) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, घरातील दुरुस्तीच्या कामावरून वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर पुढे मारहाणीत झाले. आरोपी मयूर मनोहर शिंदे (वय ३६), मयुरी मयूर शिंदे (वय २८), कलावती मनोहर शिंदे (वय ५५) व सुप्रिया केतन शिंदे (वय २८) यांनी फिर्यादी व त्यांच्या मुलाला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे.
विशेष म्हणजे, लोखंडी पाईपचा वापर करून मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेत फिर्यादी व त्यांचा मुलगा जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी खेड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम ११८(१), ११५(२), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.