रायगड (धम्मशील सावंत ) : भारत मातेच्या रक्षणासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या शूर सैनिकाचा गौरव करण्याचा अभिमानास्पद क्षण रायगड जिल्ह्यातील शिहू, मुंढाणी-झोतीरपाडा विभागाने अनुभवला.

मुंढाणी फाटा येथे अत्यंत दिमाखात पार पडलेल्या सुभेदार मंगेश नामदेव पाटील यांच्या सेवा-निवृत्ती सोहळ्याबरोबरच आंतरराष्ट्रीय जलतरणपटू कोमल मंगेश पाटील यांच्या शिवछत्रपती पुरस्कार सन्मान सोहळ्याने देशभक्ती, गौरव, कर्तव्यनिष्ठा आणि त्याग यांचा भावनिक संगम घडवून आणला.

सुभेदार मंगेश पाटील यांनी दीर्घकालीन सैन्यसेवेत अनेक आव्हानांना सामोरे जात देशाची सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या शौर्य, शिस्त आणि समर्पणामुळे केवळ त्यांचे कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण रायगड जिल्हा त्यांच्या कार्याचा अभिमान बाळगतो. त्यांच्या सेवेमुळे अनेक तरुणांना देशसेवेची प्रेरणा मिळाली आहे. या प्रसंगी सुभेदार मंगेश पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “भारत मातेची सेवा करण्याचे भाग्य लाभले, हे माझे सौभाग्य आहे. आता सेवा-निवृत्तीनंतर माझ्या जन्मभूमीची सेवा करण्यासाठी मी स्वतःला वाहून घेणार आहे. तसेच, या विभागातील जास्तीत जास्त तरुण देशसेवेस कसे जातील, यासाठीही माझे प्रयत्न असतील,” असे सुभेदार पाटील यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी सैन्य कार्यकाळातील अनेक संघर्षमय व कष्टप्रद किस्से आणि अनुभव मांडले. त्यांच्या या शब्दांनी उपस्थितांच्या मनात देशप्रेमाची नवी ज्योत प्रज्वलित झाली. निवृत्तीनंतरही समाजकार्य, युवकांना मार्गदर्शन आणि राष्ट्रप्रेमाची भावना जागृत ठेवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या अनुभवाचा लाभ समाजाला होणार असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवक घडतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. हा सोहळा केवळ निवृत्तीचा नव्हता, तर एका नव्या सामाजिक प्रवासाची सुरुवात होती. सुभेदार मंगेश पाटील यांचे आयुष्य हे देशसेवा, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यपरायणतेचे जिवंत उदाहरण आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजाने पुढे जावे, याच त्यांच्या प्रति शुभेच्छा ठरतील, असे उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.