चिपळूण : चिपळूण तालुक्यातील दसपटी भागातील स्वयंदेव गावाने एकजुटीच्या बळावर पाण्याच्या टंचाईवर कायमस्वरूपी उपाय शोधत आदर्श निर्माण केला आहे. डोंगर व दाट जंगलातून तब्बल २.५ ते ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या खापर झऱ्याचे पाणी गुरुत्वाकर्षणाच्या साहाय्याने गावातील टाकीत आणण्यात ग्रामस्थांना यश आले असून, त्यामुळे दीर्घकाळ भेडसावत असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटला आहे.

ग्रामीण विकासासाठी कार्यरत असलेल्या अनुभव प्रतिष्ठान ट्रस्ट या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने आणि जागतिक विकास कार्यक्रम (युएनडीपी-एसजीपी) तसेच पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय, भारत सरकार यांच्या आर्थिक सहाय्य व मार्गदर्शनातून ‘एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन आणि कृषी व्यवस्थापनाद्वारे जमिनीचा ऱ्हास रोखणे’ या प्रकल्पांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.

स्वयंदेव ग्रामस्थांनी तिवडी गावाच्या हद्दीत असलेल्या जिवंत खापर झऱ्याचे पाणी गुरुत्वाकर्षणाच्या साहाय्याने गावात आणल्यास पाण्याचा प्रश्न सुटू शकतो, अशी कल्पना संस्थेकडे मांडली. त्यानंतर अनुभव प्रतिष्ठान ट्रस्टचे प्रतिनिधी, तिवडी गावचे शेतकरी, नांदिवसे ग्रामपंचायत प्रतिनिधी आणि स्वयंदेव गावचे ग्रामस्थ यांच्यात चर्चा होऊन या कामासाठी सर्वांनी एकत्रितपणे सहकार्य करण्याचा निर्णय घेतला.

योजनेअंतर्गत झऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रथम दाट जंगल व उंचसखल डोंगरातून मार्ग तयार करण्यात आला. संस्थेच्या अभियंत्यांनी व कंत्राटदारांच्या मार्गदर्शनाखाली जेसीबीच्या साहाय्याने रस्ता तयार करण्यात आला. त्यानंतर ग्रामस्थांच्या श्रमदानातून पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले. झऱ्याच्या उगमस्थानी बांधबंदिस्ती करून सुमारे ६० हजार लिटर क्षमतेची टाकी उभारण्यात आली. तेथून दोन इंच व्यासाच्या पाईपलाईनद्वारे पाणी ग्रामपंचायतीच्या टाकीत आणण्यात आले.

या कामासाठी स्वयंदेव येथील प्रगतीशील शेतकरी चंद्रकांत सुर्वे यांनी पुढाकार घेतला. तसेच तिवडी येथील शेतकरी शरद पवार यांनी त्यांच्या जमिनीतून रस्ता व पाईपलाईन खोदकामासाठी सहकार्य केले. ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि संस्थेच्या प्रकल्प टीमच्या संयुक्त प्रयत्नांतून हे अवघड काम यशस्वी झाले. ग्रामपंचायतीच्या टाकीत प्रथमच झऱ्याचे पाणी येताना पाहून उपस्थित ग्रामस्थ, महिला-पुरुष, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. ग्रामस्थांनी त्या पाण्याचे पूजन करून वनभोजनाचा कार्यक्रमही आयोजित केला.

या उपक्रमामुळे स्वयंदेव, राधानगर आणि गणेशपूर परिसरातील पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात सुटली असून, उर्वरित पाण्याचा उपयोग शेतीसाठी करून दुबार पिके घेणे आणि कुटुंबांचे उत्पन्न वाढविणे शक्य होणार आहे. पाण्याचे समन्यायी वाटप व सुयोग्य व्यवस्थापनासाठी ग्रामस्थांनी ‘यूजर ग्रुप’ स्थापन करण्याची सूचना अनुभव प्रतिष्ठान ट्रस्टने केली आहे.