चिपळूण : विद्यार्थ्यांनी आपले करिअर योग्य दिशेने घडवण्यासाठी मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने मिरजोळी येथील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे उदया, रविवार दि. ५ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मोफत वैयक्तिक करिअर समुपदेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

मुस्लिम समाज विकास संघ, जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित या शिबिरामध्ये दहावी, बारावी तसेच पदवीधर विद्यार्थ्यांना करिअरविषयक मार्गदर्शन दिले जाणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना आवड व क्षमता ओळखून योग्य विषय निवडण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असून, बारावीच्या विद्यार्थ्यांना विविध प्रवेश परीक्षा, नवीन उदयोन्मुख क्षेत्रे आणि पुढील शिक्षणाच्या संधी याबाबत माहिती दिली जाणार आहे. तसेच पदवीधर विद्यार्थ्यांना व्यावसायिक क्षेत्रातील संधी, उच्च शिक्षण तसेच स्पर्धा परीक्षा याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

या समुपदेशन शिबिरात करिअर मार्गदर्शक मोमिन फय्याज अहमद, राष्ट्रीय माध्यम समन्वयक व तज्ज्ञ करिअर समुपदेशक फहीम अहमद अब्दुल बारी, प्रसिद्ध शिक्षण व करिअर समुपदेशक अब्दुल मजीद अब्दुल अजीज, करिअर मार्गदर्शक गणेश कुलकर्णी, समुपदेशक अब्दुल रऊफ खतीब, करिअर स्तंभलेखक मोहम्मद हुसैन मूसा तसेच समुपदेशन क्षेत्रातील उदयोन्मुख मार्गदर्शक रझा ए. आर. खतीब यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी पालकांसह उपस्थित राहावे तसेच सोबत पेन किंवा पेन्सिल आणि कागद आणावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या उपक्रमाचे आयोजन मुस्लिम समाज विकास संघ, जिल्हा रत्नागिरीचे अध्यक्ष मुराद अडरेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून, सचिव मोहम्मद हुसैन मूसा आणि समन्वयक ए. रऊफ खतीब हे कार्यक्रमाचे समन्वयन करीत आहेत. अधिक माहितीसाठी ७३५०४३११११, ८८७९४२५३३३ किंवा ९५५२०९१२०७ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.