मुंबई : “नाशिकमधील म्हाडा गृहप्रकल्पात गरिबांच्या हक्काची घरे हडपण्याचे प्रकरण अत्यंत गंभीर असून, यात कितीही मोठा ‘मासा’ असला तरी त्याला सोडले जाणार नाही. गरिबांचे हक्क हिरावून घेणाऱ्या आणि त्यांचे रक्त पिणाऱ्या बिल्डरांना आम्ही सोडणार नाही. प्रसंगी या प्रकरणाचा तपास ‘ईडी’कडे सोपवू,” असा सज्जड दम राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे दिला. नाशिक दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी म्हाडा घोटाळ्यावरून भूमाफियांना कडक इशारा दिला.
बावनकुळे म्हणाले की, “गरिबांसाठी असलेली २० टक्के घरे बळकावली गेली आहेत. एकाच दिवसात जमिनीचे तुकडे पाडणे, नोंदी घेणे आणि नकाशे मंजूर करणे ही मोठी रिंग आहे. या प्रकरणासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली असून, यात एक आयपीएस आणि दोन आयएएस अधिकारी आहेत. १५ दिवसांत अहवाल येईल. लाचलुचपत विभाग आणि भूमिअभिलेख विभागातून या घोटाळ्याची सुरुवात झाली असून, नाशिक विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना याप्रकरणी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. केवळ शिक्षा नाही, तर बिल्डरांकडून २० टक्के मालमत्ता परत मिळवून ती गरीबांना देणार,” असेही ते म्हणाले.
माझी जाणीवपूर्वक बदनामी; दावे दाखल करणार
मागील दोन दिवसांत समाजमाध्यमांवर असलेल्या काही व्हिडिओंबाबत बावनकुळे म्हणाले की, “मी एवढंच म्हटलं होतं की ज्यांच्या फार्महाऊस आहेत, त्यांनी फार्महाऊससाठी कर्ज घेतले आहे. ज्यांनी मर्सिडीज गाड्या घेतल्या आहेत, त्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागू नये. सामान्य गाडी शेतकरी घेतो, ट्रॅक्टर घेतो, चारचाकी वाहन घेतो, याला कुणी म्हणणार नाही; पण कर्जमाफी मागताना काही धनदांडगे लोक आहेत. त्यांच्याकडे ऐपत आहे. तेवढेच पैसे आपण गरीब शेतकऱ्यांना दिले, तर त्यांचा अधिक फायदा होऊ शकतो. गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, ही भावना होती. त्याचा आधार घेऊन अशा प्रकारचे खोटे व्हिडिओ तयार करून माझी समाजामध्ये प्रतिमा खराब करण्याचे काम सुरू आहे.”
“माझ्याकडे ८० एकर शेती असल्याचे खोटे आरोप केले जात आहेत; प्रत्यक्षात माझ्याकडे २८ एकरच जमीन आहे. जाणीवपूर्वक बदनामी केली जात असून, याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. संबंधितांविरोधात १० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहे,” या शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
महसूल संदर्भातील पुरावे एसआयटीला द्या
अशोक खरात प्रकरणात १२ गुन्हे दाखल झाले असून, यामध्ये एसआयटी तपास करत आहे आणि कोणीही सुटणार नाही. महसूल विभागातील अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी ते एसआयटीला द्यावेत, असेही ते म्हणाले.
दिंडोरी अपघात वेदनादायक
दिंडोरी येथील दुर्दैवी अपघातात ६ मुलांसह ९ जणांचा मृत्यू झाल्यानंतर संबंधित विहीर कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत दिली जाणार असून, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी उपाययोजना केल्या जातील.
राज्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ मोठ्या प्रमाणावर राबवले जात असून, एप्रिलमध्ये १० तसेच १७ तारखेला, तसेच पुढील महिन्यात शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. एनए अट रद्द करणे, तुकडेबंदी कायदा निरस्त करणे, मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना यांसारखे निर्णय जनतेपर्यंत पोहोचवले जात आहेत. पुढील तीन महिन्यांत सर्व लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्याचे नियोजन असून, नाशिकमधील आडगाव येथे सुमारे १५ योजनांचा लाभ देण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
बारामती निवडणूक बिनविरोध व्हावी
बारामती निवडणुकीसंदर्भात बोलताना ते म्हणाले, “अजित दादांचा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रत्येक परिवाराशी संबंध आहे. त्यांचा सहवास आठवून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी माझी भावना आहे. याबाबत नाना पटोले आणि इतर नेत्यांशी बोललो आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
