खोपोली : नगरपालिका हद्दीतील लव्हेज गावाजवळ स्टील कारखान्याच्या अतिरिक्त जागेत वेताळाची मूर्ती हलविल्याप्रकरणी ग्रामस्थ संतप्त झाले असून, ग्रामस्थांनी आज नगरपालिकेवर धडक मोर्चा नेऊन नगरपरिषदेनं तात्काळ विकसकाचे काम थांबवावे, अशी जोरदार मागणी केली. अखेर नगराध्यक्षांनी मुख्याधिकाऱ्यांना आदेश देऊन संबंधित काम थांबविण्यात यावे, असे सांगितले.
पन्नास वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी आपल्या जमिनी स्थानिकांना रोजगार मिळेल या भरोशावर शेतीच्या जमिनी कारखान्याला दिल्या. कारखाना उभारण्यात आला; मात्र अतिरिक्त जमिनीवर त्यांनी निवासी संकुले उभारली. या निवासी संकुलांच्या प्रांगणात वेताळ देवस्थान होते. अलीकडे सदर निवासी संकुले पाडण्यात येऊन त्या ठिकाणी सपाटीकरण सुरू असून, सदरची वेताळाची मूर्ती ठेकेदारांनी जेसीबीने हलवल्याने ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या. ग्रामस्थांनी याबाबत पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी केली होती. दरम्यान, कुठलीही कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी आज पुन्हा नगरपरिषदेवर मोर्चा नेऊन संबंधित काम थांबविण्यात यावे, अशी मागणी केली. या मोर्चात मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता.
यासंबंधीचे निवेदन नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी स्वीकारले असून, याप्रसंगी उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, पोलीस निरीक्षक सचिन अहिरे, नगररचना अधिकारी ठाकूर इत्यादी अधिकाऱ्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष करून सामाजिक कार्यकर्ते यशवंत साबळे व रवींद्र रोकडे यांनी झालेल्या बैठकीत ग्रामस्थांच्या वतीने जोरदार बाजू मांडली. अखेर नगराध्यक्ष शेंडे यांनी मुख्याधिकाऱ्यांना संबंधित विकासाचे काम थांबवण्याचे आदेश दिले व पोलीस निरीक्षक सचिन अहिरे यांना या प्रकरणाचा तपास करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी विनंती केली.
