दापोली :लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे मूळ गाव असलेल्या दापोली तालुक्यातील चिखलगाव येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळेत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि भव्य वातावरणात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. उत्तम भुवड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समिती, ग्राम विकास मंडळ (मुंबई व ग्रामीण) आणि महिला मंडळ, चिखलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
याप्रसंगी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषद सदस्या (दाभोळ गट) मा. सौ. साधना मिहीर महाजन यांच्या शुभहस्ते शाळेच्या नूतन शौचालयाचे लोकार्पण व उद्घाटन संपन्न झाले.
या कार्यक्रमाला दापोली तालुक्याच्या उपसभापती सौ. नम्रता तोणणकर, जिल्हा परिषद सदस्या मा. सौ. साधना महाजन, गटशिक्षणाधिकारी मा. श्री. सांगडे , श्री.मिहीर महाजन केंद्रप्रमुख श्री. जाधव, आणि चिखलगावचे उपसरपंच श्री. जाधव मुंबई मंडळाचे प्रतिनिधी अमर अदावडे, संतोष आडविलकर, बाबुराव मोहीते,यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
विविध स्पर्धा व बक्षीस वाटप
पुण्यतिथी निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेसह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले. तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटपही करण्यात आले या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री. नांदगावकर आणि सेवानिवृत्त शिक्षक श्री. चंद्रकांत उजाळ यांनी अत्यंत नेटकेपणाने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय शिक्षक वृंद सौ. सातपुते, सौ. पाटील यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
चिखलगाव येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी; विविध स्पर्धा आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप…
