पुणे : राज्यातील प्राथमिक शिक्षकांना बीएलओसह इतर सर्व अशैक्षणिक कामांतून मुक्त करून फक्त विद्यार्थ्यांना शिकवू द्या, असे प्रतिपादन महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांनी केले. पुणे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राज्य कार्यकारिणी सभेच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, बीएलओचे काम पूर्व-प्राथमिक ते महाविद्यालयातील शिक्षकांना समप्रमाणात द्यावयाचे शासन निर्देश असताना बहुतांश प्राथमिक शिक्षकांनाच हे काम देणे व शिक्षकांवर अनेक अशैक्षणिक कामे लादणे हा शिक्षकांसह विद्यार्थ्यांवरही मोठा अन्याय आहे. त्यामुळे यातून शिक्षकांना मुक्त करून ही कामे स्वतंत्र यंत्रणेकडे देणे हाच एकमेव पर्याय असून, त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत.
राज्यातील इयत्ता ६ वी ते ८ वीच्या वर्गांना नियुक्त असलेल्या सर्व विषय शिक्षकांचे अध्यापन कामकाज समान आहे. तरीसुद्धा महाराष्ट्र शासनाने १३ ऑक्टोबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार फक्त ३३% विषय शिक्षकांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदवीधर वेतनश्रेणी दिली जाते. ही बाब अन्यायकारक असल्याने ‘समान काम, समान वेतन’ या तत्त्वानुसार राज्यातील सर्व (१००%) विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी मिळावी, यासाठीही शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे राज्य सरचिटणीस हरीश ससनकर यांनी स्पष्ट केले.
राज्य नेते विजय भोगेकर म्हणाले, संघटना हीच शिक्षकांची ताकद असून राज्यातील शिक्षकांनी विषयानुरूप गट न करता सर्वांनी संघटित होऊन शासनाच्या अयोग्य धोरणाविरोधात लढा देणे ही काळाची गरज आहे. सभेत ज्या जिल्ह्यांत निवड श्रेणी प्रस्ताव प्रलंबित आहेत, ते तत्काळ मंजूर व्हावेत; मेडिकल बिल कॅशलेस पद्धतीने सुरू करावे; दिव्यांग, वय वर्षे ५० पूर्ण व आरोग्य समस्या असलेल्या शिक्षकांना जनगणना कामातून वगळावे; जनगणना पूर्ण होताच कार्यमुक्ती या अटीवर जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू करावी आणि बदलीनंतर सर्व रिक्त पदे तत्काळ भरावीत; पदोन्नतीने भरावयाची व रिक्त असलेली विस्तार अधिकारी श्रेणी २ व ३, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व विषय पदे ३१ मेपूर्वी भरावीत, असे निर्देश सर्व जिल्हा प्रशासनास द्यावेत, आदी मागण्यांचे ठराव संमत करण्यात आले.
दरम्यान, रत्नागिरी जिल्हा शाखेने प्रसिद्ध केलेल्या कॅलेंडरचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सभेस राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्यासह राज्य नेते विजय भोगेकर, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, महिला राज्य सरचिटणीस शारदा वाडकर, राज्य कोषाध्यक्ष जी. एस. मंगनाळे, उपाध्यक्ष अनिल उत्तरवार, विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधी के. एस. पाटील, सुनील पवार, श्रीकांत टिपूगडे, संजय गांगण, रंगराव वाडकर, इरफान मिर्झा, प्रमोद मुकेमवार, गोकुळ चारथळ, देवराव आमोदे, चंद्रकांत मोरे, संघर्षकुमार सावरकर, मनोहर पेठकर, प्रदीप पवार, यशवंत पेढांबकर, शशिकांत सपकाळ, विनोद घडशी, सुरेश धुमाळ आदी संघटनेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
