खेड : शहरातील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाच्या बांधकामाला अद्याप सुरुवात न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या सभागृहाचे भूमिपूजन २४ ऑगस्ट २०२४ रोजी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले होते. यावेळी शिवसेना नेते रामदास कदम, पालकमंत्री उदय सामंत, गृहमंत्री योगेश कदम, तसेच खासदार सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
हा प्रकल्प भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून मंजूर करण्यात आला असून, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत निधी उपलब्ध करून दिले जाणार होता. सार्वजनिक बांधकाम उपविभाग, खेड यांच्या माध्यमातून कामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार होती. मात्र, भूमिपूजनाला अनेक महिने उलटूनही प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित यंत्रणेकडून काम रखडण्यामागील कारण स्पष्ट करण्याची मागणी होत आहे. लवकरात लवकर कामाला गती देऊन सभागृहाचे बांधकाम सुरू करावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
दरम्यान या संदर्भात सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेडच्या उपअभियंता श्रीमती आशा जठाल यांच्याशी संपर्क साधला असता, सदर सभागृह बांधकामासाठी समाजकल्याण विभागाकडून निधीच उपल्बध करण्यात आला नसल्याचे सांगितले. त्यामुळे सदर कामाची वर्क ऑर्डर काढण्यात आली नसल्याचे सांगितले. लवकरच याबाबतचा निधी उपलब्ध होईल असे त्यांनी सांगितले.