मुंबई- राज्यात तापमानाचा पारा वाढत असून उन्हाचा चटका जाणवत आहे. काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा देण्यात आला असून उर्वरित ठिकाणी उष्ण दमट हवामान असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील ५ दिवस घराबाहेर पडणं टाळा असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. आज मुंबई, पुणे, कोकणात तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

सूर्याच्या झळा एप्रिलपासून तीव्र होण्यास सुरुवात झाली असून मे महिना जवळ येत आहे तसतसं उष्णतेचं प्रमाणही वाढत आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भासह मराठवाडा आणि कोकणातसुद्धा उकाडा वाढत असून पारा चाळीशीपार जाण्याचा प्राथमिक अंदाज वर्तण्यात आला आहे. राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोल्यात करण्यात आली असून, इथं आकडा 43.1 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. दरम्यान, पुढील 24 तासांमध्ये ही स्थिती कायम राहणार असून, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

किनारपट्टी भागांमध्ये दमट हवामानामुळं उष्णा अधिक जाणवेल त्यामुळं नारिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. राज्यात बहुतांशी 15 एप्रिलनंतर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. दुपारी 12 वाजल्यानंतर घराबाहेर पडणं शक्यतो टाळा असं उष्णतेचं वाढतं प्रमाण पाहता हवामान विभागानं म्हटलं आहे. लहान मुलं आणि वयोवृद्धांसह सर्वांनीच भर उन्हात बाहेर पडणं टाळावं, अगदीच महत्त्वाचं काम असल्यास उन्हापासून बचाव करण्यासाठीच्या उपाययोजना करुनच घराबाहेर पडा असा इशारा देण्यात आला आहे.