मुंबई : राज्यभरातील रस्त्यांवर सातत्याने होत असलेले अपघात आणि त्यात मृत्यूमुखी पडणा-या नागरिकांची संख्या पाहता रस्ता सुरक्षेच्या बाबतीत राज्य सरकार पूर्णतः अपयशी ठरल्याचे स्पष्ट दिसत आहे. परिवहन विभागाच्या भ्रष्ट कारभारामुळेच राज्यात अपघातांची व बळींची संख्या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
२०१९ साली राज्यात रस्ते अपघातांत १२,७८८ जणांचा मृत्यू झाला होता. २०२४ मध्ये ही संख्या २३ टक्क्यांनी वाढून १५,७१५ वर पोहोचली. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या देखील चिंताजनकरीत्या वाढत आहे. २०२४ मध्ये या मार्गावर १३७ अपघात झाले होते, तर २०२५ मध्ये ही संख्या ३७ टक्क्यांनी वाढून १८५ वर पोहोचली. मृतांची संख्या २०२४ मध्ये १२६ वरून २०२५ मध्ये १५२ इतकी वाढली आहे.
२२ जानेवारी २०२६ रोजी परिवहन आयुक्तांनी माध्यमांसाठी जारी केलेल्या निवेदनात समृद्धी महामार्गावरील अपघातांची वाढती संख्या दडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. परिवहन विभागाने आपले अपयश लपवण्यासाठी केलेली ही धडपड सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणारी ठरत असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
