मुंबई : महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपाने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले पण अधिवेशनाच्या कार्यक्रम पत्रिकेत त्याचा उल्लेखही नव्हता. महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपाला मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करून देशाचे तुकडे पाडायचे होते. सत्तेसाठी भाजपा कोणत्याही थराला जाऊ शकते पण त्यांचा कुटील डाव काँग्रेससह सर्व विरोधकांनी हाणून पाडला असून सरकार पूर्णपणे बॅकफूटवर गेले आहे, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या खुल्या चर्चेला काँग्रेस तयार आहे, कधी व कुठे यायचे ते सांगा, नरेंद्र मोदींनाही चर्चेला आणा, असे प्रतिआव्हान काँग्रेस कार्य समितीच्या सदस्या खासदार प्रणिती शिंदे यांनी दिले आहे.

महिला विधेयकाला विरोध करून काँग्रेसने भ्रूणहत्या केली या मुख्यमंत्र्यांच्या विधानाला उत्तर देताना खा. प्रणिती शिंदे म्हणाल्या की, मणिपूरमध्ये महिलांवर झालेले अत्याचार, महिला खेडाळूंवरील अत्याचार, हाथरस, उन्नाव, बदलापूर, खरात प्रकरण हे भाजपाच्या काळातच झाले आहे, ही प्रकरणे भाजपाने कशी हाताळली हे सर्वांना माहिती आहे, त्यामुळे महिलांची फक्त भ्रूण हत्याच नाही तर महिलांच्या चारित्र्याचे हनन, त्यांच्यावर अत्याचार आणि महिलांच्या हत्या करण्याचे पाप भाजप रोज करत आहे. भाजपाचा व रा. स्व. संघात महिलांना किती स्थान व सन्मान आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही, भाजपाच्या इतिहासात एकही महिला भाजपची अध्यक्षा झाली नाही याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे, असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या