लांजा (गोविंद चव्हाण) : तालुक्यातील जावडे येथील हेरिटेज कल्चर, आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, जावडे येथे १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून शैक्षणिक वर्ष २०२५–२६ चा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हेरिटेज प्रयोगभूमी, जावडे येथे विविध उपक्रम तसेच विद्यार्थ्यांची मनोगते असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या दिवशी नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रवेशोत्सवदेखील साजरा करण्यात आला. यावेळी जावडे, रावारी, माजल, बापेरे आदी गावांतील विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज भरून पुढील वर्षासाठी प्रवेश निश्चित करण्यात आला. तसेच ऑनलाइन लिंकदेखील उपलब्ध करून देण्यात आली.
यावेळी या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत संस्थेच्या अध्यक्षा ॲड. अपर्णा पवार तसेच संस्थापक संतोष कांबळे व प्रशाळेतील सर्व कर्मचारी यांनी कमलपुष्प व नव्या वर्षातील पुस्तके देऊन केले. तसेच ज्यांना पुढील वर्षासाठी प्रवेश घ्यावयाचा आहे, त्यांनी हेरिटेज प्रयोगभूमी, जावडे येथे संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
