चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करताना लाखो झाडांची कत्तल करण्यात आली. सध्या महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले तरी महामार्गालगत व मध्यभागी वृक्षारोपणाचे काम मार्गी लागलेले नाही. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे १ मे रोजी चिपळुणातील राष्ट्रीय महामार्ग विभागासमोर ‘खड्डा दफन आंदोलन’ करणार असल्याची माहिती हायवे वृक्ष लागवड हक्क समितीचे शहानवाज शाह यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

दोन वर्षांपूर्वी देखील समितीने याच विषयावर आंदोलनाची भूमिका घेतली. त्यानंतर पावसाळ्यात कामथे येथे झाडे लावण्याचा शुभारंभ झाला. मात्र पुढे नियमित हालचाली झाल्या नाहीत. महामार्गाचे ठेकेदार नागरिकांची दिशाभूल करत आहे. मात्र आता कृती झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा इशारा देखील शाह यांनी दिला. यावेळी समितीचे अजित जोशी, रामशेठ रेडीज, किशोर रेडीज, भरत लब्धे उपस्थित होते.