अलिबाग:- राष्ट्रभक्तीचा जोश आणि तिरंग्याचा अभिमान… अशाच उत्साहात अलिबाग-किहीम परिसरात आज भव्य तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. शिवसेनेचे रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य तथा माजी सभापती दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत हजारो तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
बाईकवर अभिमानाने तिरंगा फडकवत तरुणांनी झिराड-कनकेश्वर मार्गे मांडवा असा तब्बल १५ किलोमीटरचा प्रवास केला. भारत माता की जय, वंदे मातरम् आणि जय हिंदच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यावेळी उपस्थित मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रभक्तीपर मनोगत व्यक्त करुन दिलीप भोईर यांचे समाजकार्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
या रॅलीच्या माध्यमातून देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि तिरंग्याप्रती अभिमानाचा संदेश देण्यात आला. हातात तिरंगा आणि मनात देशभक्ती घेऊन सहभागी झालेल्या हजारो तरुणांच्या उत्साहामुळे अलिबाग-किहीम परिसराला अक्षरशः राष्ट्रभक्तीचे स्वरूप प्राप्त झाले.
यावेळी देशाच्या संरक्षणासाठी सेवा बजावलेल्या माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. सैनिकांच्या त्यागाला सलाम करत त्यांच्या शौर्याला अभिवादन करण्यात आले.
तिरंगा हा केवळ राष्ट्रध्वज नाही, तर तो देशाच्या स्वाभिमानाचे, एकतेचे आणि बलिदानाचे प्रतीक आहे. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांना अभिवादन करत ‘तिरंगा सदैव उंच फडकत राहो’ हा राष्ट्रभक्तीचा संदेश या रॅलीतून देण्यात आला.