खेड (प्रतिनिधी) : – उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या प्रवासी गर्दीला दिलासा देण्यासाठी कोकण रेल्वेने चिपळूण–दिवा दरम्यान विशेष मेमू (MEMU) अनारक्षित गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या १ मे २०२६ ते ७ जून २०२६ या कालावधीत दर शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी धावणार आहेत.
गाडी क्रमांक 01160 चिपळूण–दिवा मेमू विशेष दुपारी १५:३० वाजता चिपळूणहून सुटून त्याचदिवशी रात्री २३:१० वाजता दिवा येथे पोहोचेल. तर गाडी क्रमांक 01159 दिवा–चिपळूण मेमू विशेष रात्री २३:२५ वाजता दिवा येथून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:३० वाजता चिपळूण येथे पोहोचणार आहे. ही विशेष गाडी अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे-वामने, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, कासू, पेण, जिते, आपटा, सोमटणे, पनवेल, कळंबोली, तळोजा पांचनंद आणि निलजे या स्थानकांवर थांबा घेणार आहे.
या गाडीत एकूण ८ मेमू डबे असतील. अधिक तपशीलवार वेळापत्रक आणि थांबे जाणून घेण्यासाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कोकण रेल्वेच्या अद्ययावत माहितीसाठी ‘केआर मिरर’ अॅप डाउनलोड करण्याचेही सुचविण्यात आले आहे.