पेण : रायगड जिल्हा परिषद व कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक व प्रगत शेतीकडे वळविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच उपक्रमांतर्गत दिवाणमाळ येथे शेतकरी संतोष दाजी मांढरे यांच्या १० गुंठे शेतात चार सूत्री पद्धतीने भात लागवडीचा प्रयोग करण्यात आला.
यावेळी रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती वैकुंठ पाटील, जिल्हा परिषद सदस्य जनार्दन भस्मा, पंचायत समिती सदस्या कमल पवार, कृषी विभागाचे अधिकारी पवनकुमार नजन, पेण तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी प्रत्यक्ष शेतात उतरून भात लागवड केली.
शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान व शास्त्रीय पद्धतींचा स्वीकार करून उत्पादन वाढवावे, असे आवाहन सभापती वैकुंठ पाटील यांनी केले. तर चार सूत्री पद्धतीचा प्रयोग कमी क्षेत्रात नियोजनबद्ध शेतीसाठी मार्गदर्शक ठरेल, असे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी सांगितले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पंचायत समिती सभापती स्मिता पाटील, ग्रामसेविका नीलम म्हात्रे आणि संदीप तोंडीलकर यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
