छत्रपती संभाजीनगर : महिलांना लोन मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांना मोटारसायकलवर बसवून निर्जनस्थळी नेणाऱ्या आणि धमकावत सोन्याचे दागिने लुटणाऱ्या आरोपीला पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले. आरोपीकडून दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आलेल्या गुन्ह्यांतील तब्बल ८ लाख १८ हजार ७०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि एक मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२५ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजता एक महिला परिसरात उभी असताना आरोपीने तिला दोन लाख रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर आरोपीने महिलेला आपल्या मोटारसायकलवर बसवून नगर नाका पुलाच्या पुढे तिसगाव रोडवरील एका शेताजवळ नेले.
तेथे दुपारी सुमारे १२.४५ वाजता आरोपीने महिलेला धमकावत तिच्याकडील सोन्याचे दागिने लुबाडले आणि घटनास्थळावरून फरार झाला. याप्रकरणी १० ऑगस्ट रोजी संबंधित पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(४), ३१८(४) आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी परिसरात असल्याची माहिती मिळाली. तो बाहेरगावी जाण्याच्या तयारीत असल्याचे समजताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत विशेष शोधमोहीम राबवली.
पोलिसांचे पथक परिसरात पोहोचताच आरोपीने पोलिसांना चकवा देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सुमारे दोन किलोमीटर पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पोलीस कोठडीत चौकशी केल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली देत लुटलेला मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला. त्याच्याकडून १० ग्रॅम वजनाचा सुमारे १ लाख ३० हजार ७०० रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस, ४ तोळे ८ ग्रॅम वजनाचे सुमारे ६ लाख २४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण आणि ४० हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण ८ लाख १८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
