चिपळूण : श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिपळूण यांच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त कै. कमळाकरशेठ चितळे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि. 6 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजता प्रख्यात व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांचे ‘राष्ट्र पुरुषांचे आदर्श नव्या पिढीची जबाबदारी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर रंगमंच, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, मार्कंडी, चिपळूण येथे हा कार्यक्रम संपन्न होईल. यंदा श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा 75 वा अमृत महोत्सवी वर्ष असल्याने या व्याख्यानमालेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मंडळाची स्थापना 1952 साली झाली असून सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात मंडळाचे भरीव योगदान आहे.

या कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष श्री. मोहन मिरगल, कार्याध्यक्ष श्री. रमण डांगे, सचिव श्री. प्रंजन पिंपुटकर, खजिनदार श्री. चंद्रशेखर साबळे उपस्थित राहणार आहेत. या व्याख्यानाचे प्रायोजक उद्योजक श्री. प्रकाश देशमुख, चिपळूण हे आहेत. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून होणाऱ्या या व्याख्यानाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.