खेड : – तालुक्यातील वाडीबीड – देऊळवाडी, कोरेगांव-बेलवाडी आणि भरणे बाईतवाडी या तीन ठिकाणी खेड पोलिसांनी दि. २० मे २०२६ रोजी दारू विक्रेत्यांवर कारवाई केली असून त्यांच्याकडुन केवळ ६ हजार २०० रूपयांची गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आहे.
खेड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील वाडीबीड – देऊळवाडी येथे २० मे २०२६ रोजी सकाळी ११:४० वाजता संशयित आरोपी अश्विनी अशोक कदम (५०, रा. वाडीबीड- देऊळवाडी) हि आपल्या राहत्या घराच्या बाजूच्या मोकळ्या जागेत एक हजार रूपये किंमतीची ९ लीटर गावठी हातभट्टीची दारू विक्री करण्यासाठी ताबे कब्जात असताना मिळून आली. याबाबतची फिर्याद खेड पोलीस स्थानकाच्या महिला पोलीस शिपाई आरती किरण डोंगरे यांनी दाखल केली आहे. तसेच तालुक्यातील कोरेगांव- बेलवाडी येथे दि. २० मे २०२६ रोजी दुपारी २ वाजता तळ्याचे वाकण शेजारील झोपडपट्टीजवळ संशयित आरोपी नारायण सिताराम कदम (४५, रा. कोरेगांव- बेलवाडी) हा ३५ लिटर क्षमतेच्या प्लास्टिकच्या कॅनमध्ये २ हजार ६०० रुपये किंमतीची २५ लिटर गावठी हातभट्टीची दारू विक्री करण्यासाठी ताबे कब्जात असताना मिळून आला. याबाबतची फिर्याद खेड पोलीस स्थानकाचे पोलीस शिपाई किरण रमेश सपकाळे यांनी दाखल केली आहे तसेच तालुक्यातील भरणे – बाईतवाडी येथे दि. २० मे २०२६ रोजी दुपारी ३ वाजता संशयित आरोपी संजय मधुकर जगदाळे (५१, रा. भरणे-बाईतवाडी) हा ३५ लिटर क्षमतेच्या प्लास्टिकच्या कॅनमध्ये २ हजार ६०० रुपये किंमतीची २५ लिटर गावठी हातभट्टीची दारू विक्री करण्यासाठी ताबे कब्जात असताना मिळून आला. याबाबतची फिर्याद खेड पोलीस स्थानकाचे पोलीस शिपाई विजेंद्र रमेश सातार्डेकर यांनी दाखल केली आहे.