लांजा (गोविंद चव्हाण) : मोपा एअरपोर्ट पोलीस स्टेशन, गोवा येथील पोलीस निरीक्षक निनाद देऊलकर यांनी लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांना माहिती कळवली. त्यानंतर लांजा पोलिसांनी फिल्डिंग लावली.

गोवा येथील पात्रादेवी येथे कंटेनर गाडी क्र. एम.एच. १२ व्ही.टी. ७०४८ ने अपघात करून लांजाच्या दिशेने पलायन केले होते. याबाबत गोवा पोलिसांनी लांजा पोलिसांशी मोबाईलवरून संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

लगेच लांजा पोलीस स्थानकाचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी पोलीस कर्मचारी बजागे, भुजबळ, आर्डे, पवार व नाईकवाडे यांना नाकाबंदी करण्यासाठी पाठवले. तात्काळ कुवे येथे नाकाबंदी करण्यात आली. अपघातग्रस्त कंटेनर तेथे आल्यानंतर पोलीस कर्मचारी बजागे व आर्डे यांनी गाडी थांबवण्याचा इशारा दिला. मात्र चालकाने गाडी न थांबवल्याने लांजा पोलिसांनी पाठलाग करून कंटेनर पकडला व लांजा पोलीस स्टेशन येथे आणला.

कंटेनर चालक अजिम खान (वय २५), रा. जामपाखरी पोस्ट चौबे, जमतासाई बस्ती, उत्तर प्रदेश याला कंटेनरसह पोलीस स्थानकात आणण्यात आले. त्यानंतर त्याला गोवा मोपा एअरपोर्ट पोलीस स्टेशनचे स्टाफ हेड कॉन्स्टेबल मिलिंद पोटे (ब.क्र. ४९५७) व हेड कॉन्स्टेबल गोरे (ब.क्र. ७२५७) यांच्या ताब्यात देण्यात आले.