लांजा : विनापरवाना विदेशी दारू विक्रीप्रकरणी लांजा पोलिसांनी कोंडगे पहिलीवाडी येथील ६० वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंडगे पहिलीवाडी येथे एक महिला विनापरवाना विदेशी दारूची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार लांजा पोलिसांनी बुधवारी, २० मे रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास कोंडगे पहिलीवाडी येथे धाड टाकली. यावेळी वैशाली गणेश कदम (वय ६०, रा. कोंडगे पहिलीवाडी, ता. लांजा) ही विदेशी मद्यसाठ्यासह आढळून आली.
या कारवाईत पोलिसांनी २०२५ रुपये किमतीचे ‘लंडन पिल्झनर’ नावाचे लेबल असलेले ५०० मिली मापाचे बिअरने भरलेले पत्र्याचे डबे, ६०० रुपये किमतीच्या ‘मास्टर डिलाईट व्हिस्की’च्या १८० मिली मापाच्या चार सीलबंद बाटल्या, तसेच ६४५ रुपये किमतीची ‘ओल्ड मॉंक रम’ नावाचे लेबल असलेली १८० मिली मापाची विदेशी दारूची बाटली, असा एकूण ३२७० रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त करण्यात आला. विनापरवाना व बेकायदेशीर विदेशी दारूसाठा विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी वैशाली कदम हिच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ चे कलम ६५ (इ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश आखाडे हे करत आहेत.