मुंबई- राज्यात दुहेरी वातावरण पाहायला मिळत आहे. एकीकडे विदर्भ उन्हाच्या कडाक्याने होरपळत असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावून नागरिकांना दिलासा दिला आहे. काल मुंबईसह पुणे, कोकणात पावसाच्या सरी कोसळल्या. आज देखील कोकणासह सातारा, सांगली जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांत तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने रेड अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
दरम्यान, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्येही उष्णतेचा प्रभाव कायम राहणार आहे. दुसरीकडे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, विजांचा कडकडाट आणि अचानक पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
