अकोला : देशभरात सातत्याने वाढत असलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अधिक कठीण बनले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडलेल्या दरांमुळे नागरिकांसह शेतकरी वर्गही मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जात आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अकोला शहरात वाढत्या महागाईविरोधात भव्य बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
टॉवर चौक येथील वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिक, शेतकरी, महिला तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन नागरिकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वाढत्या इंधन दरांमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली.