चिपळूण : तालुक्यातील सुमारे १६ गावांना जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या पिंपळी–नांदिवसे मार्गावरील पुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, कामगार, विद्यार्थी, व्यापारी तसेच औद्योगिक क्षेत्राशी संबंधित नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
सदर पुलासाठी कार्यसम्राट, पालकमंत्री तथा उद्योगमंत्री मा. उदयजी सामंत साहेब यांनी सुमारे ३० कोटी रुपयांचा निधी तात्काळ उपलब्ध करून दिला. मात्र, संबंधित MIDC व बांधकाम विभागाकडून आवश्यक तांत्रिक प्रक्रिया, समन्वय व नियोजन वेळेत पूर्ण करण्यात आले नाही. परिणामी, आजही अनेक तांत्रिक बाबी अपूर्ण अवस्थेत आहेत. विशेष म्हणजे, संबंधित विभाग एकमेकांकडे बोट दाखवत जबाबदारी टाळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे.
जर सदर पुलाचे काम तातडीने युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले नाही, तर येत्या पावसाळ्यात पर्यायी मार्गांवरील वाहतूक पूर्णतः ठप्प होण्याची शक्यता आहे. परिणामी, कामगारांना औद्योगिक क्षेत्रात पोहोचणे अशक्य होईल, विद्यार्थी शाळा-महाविद्यालयात जाऊ शकणार नाहीत तसेच औद्योगिक वसाहतीमधील जीवनावश्यक वस्तू, कच्चा माल व तयार मालाची वाहतूक विस्कळीत होऊन MIDC चे कामकाज प्रभावित होण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
