चिपळूण : वर्धापन दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय, कामथे येथे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तालुक्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या उपक्रमातून पक्षाविषयी असलेला विश्वास आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारांप्रती वाढत असलेली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन विकासाचे राजकारण करण्याची भूमिका सातत्याने मांडणारे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचारांमुळे आजही मोठ्या प्रमाणावर युवक, महिला, शेतकरी, कष्टकरी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिक पक्षाशी जोडले जात आहेत. चिपळूण विधानसभा मतदारसंघातही याच विचारांच्या प्रेरणेने अनेक नवीन चेहरे पक्षाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेत असल्याचे चित्र या उपक्रमातून पाहायला मिळाले.

वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम केवळ औपचारिक कार्यक्रम न ठरता समाजाशी संवाद साधण्याचे, सामाजिक बांधिलकी जपण्याचे आणि पक्षाची विचारधारा अधिक व्यापक स्तरावर पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम ठरला. उपस्थित कार्यकर्त्यांनी आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि शरदचंद्र पवार साहेबांचे विचार घराघरांत पोहोचविण्यासाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.