मुंबई : आजवर उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे नेतृत्व करावे, ते आंतरराष्ट्रीय पातळीचे नेते आहेत असे म्हणणाऱ्या संजय राऊतांचा आता उद्धव ठाकरेंवरचाही विश्वास उडाला आहे. आता उद्धव ठाकरेंचे नाव बाजूला सारत शरद पवारांनी या वयात विरोधकांचे नेतृत्व करावे, असा सल्ला संजय राऊत देताहेत. याचा अर्थ उद्धव ठाकरेंचे नेतृत्व कमकुवत आहे, त्यांच्या नेतृत्वाला इंडिया आघाडीत काहीही किंमत उरलेली नाही हे संजय राऊत मान्य करतात. आदित्य ठाकरे हे संजय राऊतांचे वक्तव्य गांभीर्याने घेतील, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विरोधकांनी 2014 ला एकत्र येण्याचा प्रयत्न केला. 2019 ला एकत्र येण्याचा प्रयत्न केला आणि 2024 लाही त्यांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला. हे झुंडीने आले काय किंवा एकटे आले काय. काहीही फरक पडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे नेतृत्व या देशातल्या जनतेने स्वीकारलेले आहे. त्यामुळे उद्धवजी ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, नव्याने आलेले कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके हे सगळे एकत्र आले तरी काहीही फरक पडणार नाही. एक अकेला सबपे भारी, हे या देशातल्या जनतेला माहित असल्याचे श्री. बन म्हणाले.
संजय राऊत यांनी कुणाला घाशीराम कोतवालची उपमा देऊ नये, असे सांगून श्री. बन म्हणाले की, ते स्वतः महाभारतातील शकुनी मामाप्रमाणे आहेत. धृतराष्ट्राला चुकीचे सल्ले देऊन संपूर्ण साम्राज्य खालसा करण्यास शकुनी मामाने भाग पाडले होते तशाच पद्धतीने संजय राऊत यांनी आधुनिक शकुनीमामा होऊन उद्धव ठाकरे यांचे साम्राज्य खालसा केले. उद्धव ठाकरे यांचा पूर्ण पक्ष रसातळाला नेऊन पोहोचवला. आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवायचे स्वप्न पहात पहात उद्धव ठाकरे यांचा पूर्ण पक्ष संपला. महाभारतात जसा कौरवांचा पराभव झाला अगदी त्याचपद्धतीने विधानसभेच्या निवडणुकीला उद्धव ठाकरे. शरद पवार, काँग्रेस यांचा पराभव झाला. त्याला फक्त आणि फक्त संजय राऊत नावाचे कपटी, कटकारस्थानी शकुनीमामा जबाबदार आहेत.
उद्धव ठाकरेंवरचा विश्वास उडाल्यानेच संजय राऊतांनी केली शरद पवारांची शिफारस – नवनाथ बन यांचा प्रहार
