मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग ४३९९ दिवस देशाचे नेतृत्व करत नवा विक्रम प्रस्थापित केला असून केंद्रातील मोदी सरकारलाही १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने राजस्थानमधील प्रसिद्ध अजमेर शरीफ दर्ग्यावर विशेष चादर अर्पण करण्यात आली. यावेळी देशाच्या प्रगतीसाठी, सामाजिक सौहार्दासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी विशेष दुवा पठण करण्यात आले.
भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दिकी तसेच सुफी संवाद अभियानाचे डॉ. अस्लम खान यांच्या संकल्पनेतून अजमेर शरीफ दर्ग्यावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात देशाच्या प्रगतीसाठी, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी विशेष दुवा पठण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विक्रमी ४३९९ दिवसांच्या कार्यकाळाबद्दल तसेच केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या यशस्वी वाटचालीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत दर्ग्यावर चादर अर्पण करण्यात आली. यावेळी भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध समाजघटकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजप अल्पसंख्यांक नेते अबिद अली यासीन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हा धार्मिक व सामाजिक कार्यक्रम पार पडला. अजमेर शरीफ दर्ग्यावर पारंपरिक पद्धतीने चादर अर्पण करून देशाच्या विकासासाठी प्रार्थना करण्यात आली. तसेच केंद्र सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचत असल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.