मुंबई – मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कारभाराविरोधात आणि लोकशाही तथा संविधानाच्या रक्षणासाठी आज मुंबईत ‘गर्जना मोर्चाचे’ आयोजन करण्यात आले. या मोर्चात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र येत केंद्र सरकार आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या धोरणांवर सडकून टीका केली. केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुत्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाकरे बंधूंनी दंड थोपटले आहेत. ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चात एसआयआर रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. राज ठाकरेंनी दोन प्रमुख मागण्या केल्या. त्यात त्यांनी एसआयआर रद्द करण्याची मागणी प्रामुख्याने केली. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी थेट निवडणूक आयोगच्या आयुक्तांच्या निवडीवर आक्षेप घेतला. राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक होते, मग निवडणूक आयुक्तांची का नाही? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. भारत देश ज्ञानेश कुमारांच्या बापाचा नाही, असं म्हणत ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, हा लढा कोणत्याही एका पक्षाचा, व्यक्तीचा, जातपात, धर्माचा नाही, हा लढा आपल्या स्वातंत्र्याचा लढा आहे. राज ठाकरेंनी सांगितलेल्या मतदारांच्या आकडेवारीचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. देशभर महिलांवर अत्याचाराच्या घटना घडतं आहेत. कुठे तुमचं हिंदुत्ववादी सरकार, हे तुमचं हिंदुत्व आहे का? आज संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे. शेतीवर अवलंबून असलेला अन्नदाता याच्यावर जी परिस्थिती ओढावली, त्याचे आपण कल्पना करू शकत नाही. यांना शेतकऱ्यांचं दुःख दिसत नाही. यांना एकच उद्योग आहे. ते पक्ष फोडत आहेत. ज्ञानेश कुमार हे त्यांचे हत्यार आहे. आता मताधिकाराचा हक्क ही त्यांनी चोरला आहे. तुम्ही मत चोरी केली असेल. पण त्यांच्या अजून एक गोष्ट लक्षात आलेली नाही. तुम्ही न्यायसंस्था ताब्यात घेतली असेल. प्रशासन तुम्ही ताब्यात घेतली असेल. हे रस्ते जनतेच्या मालिकेचे आहेत. या रस्त्यावर फिरणं तुम्हाला जिकरीचं होईल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
राज ठाकरे यांनी म्हटलं की, “देशातील तर होईलच, पण महाराष्ट्रात आतापर्यंत जी एसआयआर प्रक्रिया झाली आहे ती रद्द झाली पाहिजे. एसआयआरचं जे प्रकरण आता देशभरात सुरू आहे ते बेकायदेशीर आहे. एसआयआरमधून महाराष्ट्रातील दोन कोटी मतदार बाहेर काढले आहेत, हे कोण आहेत दोन कोटी लोक? म्हणून माझी सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे की, दिल्लीत हा विषय मांडताना एसआयआर रद्द करणे आणि व्होटिंग मशीन बंद होऊन बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे, या आपल्या मागण्या हव्यात. या दोन गोष्टी झाल्या तर ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल. उद्या कोणाचीही सत्ता येवो, काहीही फरक पडत नाही. पण ती सत्ता योग्य मार्गाने यावी,” अशी अपेक्षा राज यांनी व्यक्त केली आहे.
“मुंबईत वातावरण तापलंय ते उन्हामुळे आणि देशात वातावरण तापलंय ते मतचोरीमुळे. २०१७ पासून मी सांगतोय की यामध्ये चोऱ्या केल्या जात आहेत. तेव्हापासून मी विविध नेत्यांना भेटून सांगत होतो की, निवडणूक आयोगापासून ईव्हीएमपर्यंत या गोष्टींमध्ये घोळ सुरू आहे, आपण यावर पाऊल उचललं पाहिजे. निवडणुकीवर बहिष्कार टाका, असं आवाहन मी केलं होतं, कारण त्याशिवाय सत्य समोर येणार नाही. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला बहुमत मिळालं, पण संपूर्ण महाराष्ट्रात सन्नाटा होता. हा कसला विजय आहे? लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान ४० ते ६० लाख मतदार वाढवले गेले. असा कुठला वायग्रा आला की अचानक एवढे मतदार वाढले,” असा हल्लाबोलही राज ठाकरेंनी केला आहे.
