मुंबई – शिवसेनेचे ख-या अर्थाने नेतृत्व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच करीत असल्याची जनभावना असल्याचे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज व्यक्त केले. शिवसेनेच्या 60 व्या वर्धापनदिनानिमीत्त शुभेच्छा देतांना ना.रामदास आठवले यांनी शिवसेनेचे नेतृत्व उध्दव ठाकरेंपेक्षा ख-या अर्थाने एकनाथ शिंदेकडे असल्याची महाराष्ट्रातील लोकांची भावना असल्याकडे लक्ष वेधले.
शिवसेनेचा 60वा वर्धापनदिन उध्दव ठाकरे साजरा करीत असले, तरी 60 या अंकातले 6 एकनाथ शिंदे घेवुन गेले असून उध्दव ठाकरेकडे शुन्य शिल्लक राहिलेला आहे, असा खोचक टोला ना.रामदास आठवले यांनी आज उध्दव ठाकरेंना लगावला.

शिवसेनेची स्थापना दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी केली. त्यांनी अनेकदा रिपब्लिकन पक्ष, शिवसेना, भाजप एनडीए सोबत येत नसल्यामुळे शिवसेना भाजप युतीला महाराष्ट्रात आणि एनडीएला देशात सत्ता मिळत नसल्याचे मत दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केले होते. त्यांनी अनेकदा आपल्याला शिवसेना भाजप युतीसोबत येण्याचे आवाहन केले. त्यांची शिवशक्ती-भिमशक्ती युतीची मनापासुन इच्छा होती. त्यांची इच्छा साकार करण्याच काम आपण 2011 मध्ये शिवशक्ती भीमशक्ती भाजप महायुती करून केले. शिवसेना, भाजपसोबत रिपब्लिकन पक्षाने शिवशक्ती-भिमशक्ती महायुतीचा प्रयोग केला. तेव्हापासुन शिवसेना भाजपकडे सत्ता आली. कॉग्रेसला सत्तेतुन हद्दपार करण्याचे काम रिपब्लिकन पक्षाने शिवसेना भाजप युतीला साथ दिल्यामुळे झालेले आहे.