मुंबई : उत्तर मुंबईच्या शिक्षण क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या मालाड (पश्चिम) येथील मुंबई पब्लिक स्कूल (लिबर्टी गार्डन) या अत्याधुनिक शैक्षणिक संकुलाचे लोकार्पण केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री तथा उत्तर मुंबईचे खासदार मा. श्री. पियूष गोयल यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. सुमारे ₹३५ कोटींच्या खर्चातून उभारण्यात आलेली ही आधुनिक शाळा महानगरपालिका शिक्षण व्यवस्थेतील परिवर्तनाचे प्रतीक मानली जात आहे.
या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, आमदार अस्लम शेख, सभागृह नेते गणेश खणकर, शिक्षण समिती अध्यक्षा राजश्री शिरवाडकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अविनाश ढाकणे, सुधार समिती अध्यक्षा संध्या दोषी, स्थापत्य समिती अध्यक्षा संगीत ज्ञानमूर्ती शर्मा, स्थानिक नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य तेजिंदर सिंग तिवाना, नगरसेवक योगेश वर्मा, नगरसेविका योगिता कोळी, माजी नगरसेविका जया तिवाना, विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांनी नव्या शाळेच्या इमारतीची वैशिष्ट्ये, आधुनिक सुविधा आणि भविष्यातील शैक्षणिक विकासाच्या योजनांची माहिती दिली.
सन २०१९ मध्ये जुनी शाळा इमारत धोकादायक घोषित झाल्यानंतर विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आले होते. नव्या इमारतीसाठी स्थानिक नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी सातत्याने पाठपुरावा करून प्रशासकीय स्तरावर आवश्यक मंजुरी, निधी आणि कामाच्या गतीसाठी प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळत आज विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या. G+6 मजली ही भव्य शाळा सुमारे १,५३० विद्यार्थ्यांच्या क्षमतेची असून त्यामध्ये ५१ वर्गखोल्या, २ बालवाडी कक्ष, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, ग्रंथालय, व्हर्च्युअल लर्निंग रूम, सेमिनार हॉल, अॅक्टिव्हिटी हॉल, बहुउद्देशीय सभागृह, चित्रकला कक्ष, मध्याह्न भोजन कक्ष, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा आणि आधुनिक लिफ्ट व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण क्षेत्रातील हा प्रकल्प केवळ एका नव्या इमारतीचे उद्घाटन नसून “प्रत्येक मुलाला उत्कृष्ट शिक्षणाचा अधिकार” या संकल्पनेला मूर्त स्वरूप देणारा उपक्रम असल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले. या लोकार्पणामुळे मालाड परिसरातील शिक्षण क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात झाली असून महानगरपालिका शिक्षण व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला.