मुंबई : भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईतर्फे आज देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात काळा अध्याय असलेल्या ‘आणीबाणी’च्या विरोधात मुंबईच्या सर्व ६ जिल्ह्यांमध्ये व्यापक स्तरावर पदयात्रा व सायकलिंग कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाजपा मुंबई अध्यक्ष तथा आमदार श्री अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजयुमो मुंबई अध्यक्ष श्री दीपक सिंह यांच्या नेतृत्वात आयोजित या अभियानात हजारो युवा कार्यकर्त्यांनी सहभाग घेत लोकशाहीच्या रक्षणाचा संकल्प केला.
कार्यक्रमादरम्यान कार्यकर्ते व नागरिकांना २५ जून १९७५ च्या त्या भयावह घटनेची आठवण करून देण्यात आली, जेव्हा तत्कालीन काँग्रेस सरकारने सत्तेच्या रक्षणासाठी संपूर्ण देशावर आणीबाणी लादली होती. तो काळ असा होता की अटक ही सामान्य बाब झाली होती, मतभिन्नता हा गुन्हा ठरला होता, प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर बंधने घालण्यात आली होती आणि लोकशाहीवर पहारा बसविण्यात आला होता. यावेळी सर्व जिल्ह्यांतील उपस्थित कार्यकर्त्यांनी लोकशाही रक्षणाची विशेष प्रतिज्ञा घेतली. या प्रतिज्ञेमध्ये देशावर पुन्हा कधीही संविधानविरोधी व लोकशाहीविरोधी कालखंड येऊ नये, यासाठी आपण सदैव सजग राहू असा संकल्प करण्यात आला. तसेच देशाच्या लोकशाही परंपरा, संविधान आणि राष्ट्रीय मूल्यांच्या रक्षणासाठी आवश्यकता भासल्यास सर्वस्व अर्पण करण्याचाही निर्धार करण्यात आला.
भाजयुमो मुंबई अध्यक्ष श्री दीपक सिंह यांनी यावेळी सांगितले की, “२५ जून १९७५ हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील तो काळा दिवस आहे, जेव्हा सत्ता संविधान, लोकशाही आणि कायद्यापेक्षा वरचढ ठरविण्याचा घातक प्रयत्न करण्यात आला होता. खुर्ची वाचविण्यासाठी संपूर्ण देशाला आणीबाणीच्या बेड्यांमध्ये जखडण्यात आले. लाखो लोकशाही सेनानींना तुरुंगात डांबण्यात आले, वृत्तपत्रांचा आवाज दाबण्यात आला, न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्यात आला आणि नागरिकांचे मूलभूत अधिकार हिरावून घेण्यात आले.”
