धडगाव : धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम आणि डोंगराळ भाग असलेल्या तोरणमाळ येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. यासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिक विभागीय आयुक्तांना तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
तोरणमाळ परिसरातील आदिवासी नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी सुमारे ५० किलोमीटरचा प्रवास करून धडगाव तहसील कार्यालयात जावे लागते. विशेषतः पावसाळ्यात रस्ते बंद झाल्याने नागरिकांचा प्रशासनाशी संपर्क तुटण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे या भागात स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालयाची मागणी अनेक वर्षांपासून होत होती.
या भागाच्या दौऱ्यादरम्यान स्थानिक नागरिकांनी ही मागणी लोकप्रतिनिधींसमोर मांडली होती. त्यानंतर हा विषय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा करून मांडण्यात आला. मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन बावनकुळे यांनी नाशिक विभागीय आयुक्तांना आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अप्पर तहसील कार्यालय सुरू झाल्यास तोरणमाळ आणि परिसरातील आदिवासी नागरिकांना महसूल व इतर शासकीय सेवांसाठी दूरचा प्रवास करावा लागणार नाही. त्यामुळे स्थानिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ आणि जलद उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
