रायगड. : एक अत्यंत संतापजनक आणि प्रशासनाचे डोळे उघडणारी मोठी बातमी रायगड जिल्ह्यातून समोर येत आहे. दक्षिण काशी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या हरिहरेश्वरजवळील बाणगंगा, सावरवाडी आणि साक्षभैरी या तीन वाड्यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची पावसाच्या सुरुवातीलाच अक्षरशः दुरवस्था झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या १५ वर्षांत या रस्त्याची साधी डागडुजीदेखील झालेली नाही. या रस्त्यावरील भीषण परिस्थितीचा एक धक्कादायक व्हिडिओ आता समोर आला असून, त्यामध्ये चिखलाच्या दलदलीमुळे एक रिक्षा पुढे जाण्याऐवजी पाठीमागे सरकत फरफटताना दिसत आहे.

स्क्रीनवर दिसणारी ही दृश्ये कोणत्याही दुर्गम भागातील किंवा जंगलातील नाहीत, तर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हरिहरेश्वरजवळील बाणगंगा येथील मुख्य रस्त्याची आहेत. पाऊस सुरू होताच या रस्त्यावर चिखलाचे असे साम्राज्य पसरले आहे की, येथून साधे वाहन चालवणेही म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे.

या मुख्य रस्त्याचा वापर बाणगंगा, सावरवाडी आणि साक्षभैरी या तीन वाड्यांतील शाळकरी मुले, नोकरदार तसेच वयोवृद्ध नागरिक दररोज करतात. मात्र, या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे गावातील आरोग्य व्यवस्था अक्षरशः व्हेंटिलेटरवर आली आहे. दवाखान्यात जाण्यासाठी अवघ्या ५ मिनिटांचा असलेला हा प्रवास आता रुग्णांना २० ते २५ मिनिटे चिखल तुडवत करावा लागत आहे. रुग्णावर उपचार करून त्याला पुन्हा घरी आणणेही आता कठीण झाले आहे, कारण कोणतीही रिक्षा किंवा अन्य वाहन या चिखलातून जाण्यास तयार होत नाही.