रायगड : रायगड जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या मासिक सर्वसाधारण सभेत मंजूर उपविधीनुसार थकीत कर्जदारांकडून कर्जाची वसुली करण्यात यावी, अशी भूमिका मांडल्यानंतर संचालक तथा वासांबे मोहोपाडा ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी वैभव बाळकृष्ण पाटील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, दि. 28 जून 2026 रोजी पतसंस्थेच्या मासिक सर्वसाधारण सभेत एका थकीत कर्जदाराच्या थकबाकीचा विषय उपस्थित झाला. त्यावेळी मंजूर उपविधी व सहकार कायद्यानुसार थकीत कर्जाची वसुली करण्यात यावी, अशी भूमिका संचालक तथा वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी वैभव पाटील यांनी मांडली. त्यानंतर काही व्यक्तींनी सभेबाहेर फिर्यादीचा मार्ग अडवून शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी गुन्हा क्र. 146/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 मधील कलम 126(1), 296(b), 351(2), 352 व 3(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
संचालक वैभव पाटील यांनी सांगितले की, “संस्थेचा पैसा सुरक्षित राहावा, थकीत कर्जाची कायदेशीर वसुली व्हावी आणि सभासदांच्या हिताचे संरक्षण व्हावे, हीच आमची भूमिका आहे. कायद्याचे पालन करणाऱ्यांवर दबाव टाकण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत. या प्रकरणात निष्पक्ष तपास करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी.”
या घटनेमुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली असून, संस्थेतील पारदर्शक कारभार, आर्थिक शिस्त आणि सभासदांच्या हक्कांचे संरक्षण याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
