मुंबई (सुनील साळवी ) : चिपळूणचा उड्डाणपूल ३१ जुलै पर्यंत पूर्ण होऊन एक ऑगस्टला सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची पहिली गाडी त्यावरून रवाना व्हावी, कुंभार्ली घाट भुयारी मार्ग आणि परशुराम घाट कॉरिडॉर हे दोन्ही प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावेत, चिपळूण नगरपालिका आणि देवरुख नगरपंचायतीच्या महत्त्वपूर्ण पाणी योजनेसाठी निधीची तातडीने उपलब्धता व्हावी, चिपळूण आपत्ती निवारण योजनेसाठी १५ कोटींचा निधी ताबडतोब मंजूर व्हावा, कर्जजुवे – भातगाव पुलासाठी निधी मिळावा अशा महत्त्वपूर्ण मागण्या आमदार शेखर निकम यांनी काल महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात भाग क्रमांक १०७/७५ वरील पुरवणी मागण्यांवर बोलताना आग्रहपूर्वक मांडल्या.अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने आमदार निकम यांनी आपले मुद्दे मांडून संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधून घेतले.

आमदार निकम यांनी करजुवे –भातगाव पुलासाठी यापूर्वी 23 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असला, तरी उर्वरित निधी न मिळाल्याने काम अद्याप सुरू होऊ शकलेले नाही, याकडे शासनाचे लक्ष वेधले. या परिसराचा संबंध विधानसभेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय दत्ताजी नलावडे यांच्या कार्यभूमीशी असल्याचे सांगत, उर्वरित निधी तातडीने मंजूर करून पुलाचे काम मार्गी लावावे, अशी विशेष विनंती त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे केली.

यावेळी कुंभार्ली घाटातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वरील सोनपात्र मंदिर ते घाटमाथा या भुयारी मार्गाच्या प्रस्तावालाही त्यांनी विशेष महत्त्व दिले. हा मार्ग पूर्ण झाल्यास पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांच्यातील दळणवळण अधिक वेगवान आणि सुरक्षित होईल, तसेच आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.