लांजा : (गोविंद चव्हाण) लांजा येथील नगरसेवक रफीक नेवरेकर यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून लांजा येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप केले. वाढदिवसानिमित्त कोणताही अनावश्यक खर्च टाळत सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी हा सेवाभावी उपक्रम राबविला.

रुग्णांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, त्यांना पौष्टिक फळांचा आहार मिळावा आणि त्यांच्याप्रती संवेदनशीलता व्यक्त व्हावी, या मुख्य उद्देशाने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गरजू रुग्णांना रफीक नेवरेकर यांनी फळांचे वाटप केले.

दरम्यान, यावेळी रुग्णालयातील सर्व वॉर्डमध्ये जाऊन रफीक नेवरेकर यांनी रुग्णांची विचारपूस केली. या उपक्रमामुळे रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पाहायला मिळाले. याप्रसंगी रफीक नेवरेकर यांच्यासोबत असीम पाटणकर, वसीम मुजावर, राजू मुजावर, तन्वीर नेवरेकर, आजीम मापारी आदी उपस्थित होते.