चिपळूण : परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूणच्या गुरुकुल विभागामध्ये राष्ट्रीय चिकित्सक दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. चिपळूण लायन्स क्लब व लिओ क्लब यांच्या सहकार्याने गुरुकुलमधील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वैद्यकीय क्षेत्राचा परिचय करून देण्यासाठी वैद्यांच्या मुलाखतीचा अनोखा उपक्रमही राबविण्यात आला.
या कार्यक्रमास गुरुकुल शाळा समितीच्या अध्यक्षा सौ. सारिका भावे, संस्था पदाधिकारी श्री. तुषार गोखले, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. संजय बनसोडे, विभाग प्रमुख श्री. मंगेश मोने आदी उपस्थित होते. मान्यवरांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ. प्राची हरवंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
स्वागतप्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष श्रीनिवास परांजपे यांनी मनोगत व्यक्त करताना, “मी या शाळेचा माजी विद्यार्थी असल्याचा मला अभिमान आहे. शाळेच्या विकासासाठी भविष्यातही सर्वोतोपरी सहकार्य करण्यास सदैव तयार आहे,” असे सांगितले. यावेळी श्री. रमेश रेळेकर, श्री. राजीव कांबळी, श्री. शाम परांजपे, श्री. पंकज ओसवाल, लिओ क्लबचे अध्यक्ष सुयश कदम यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
आरोग्य तपासणीसाठी डॉ. प्राची हरवंदे, डॉ. शेखर भुवड व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची सखोल तपासणी करून आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. निरोगी जीवनशैली, स्वच्छता आणि पौष्टिक आहाराचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.